लेखिका: नंदिनी बाळ देशमुख

एपिलेप्सी  (फिट्स) म्हणजे काय?

फिट्स येण्याचा संबंध मेंदूच्या  कार्याशी आहे. आपल्या सर्व हालचाली मेंदूच्या मार्गदर्शनाखाली होतात. मेंदू मधे होणाऱ्या विधुत घडामोडींमुळे या सर्व कृती मेंदूच्या नियंत्रणाखाली असतात. एपिलेप्सी च्या स्थितीत,  मेंदूत अधिक विधुत प्रवाह निर्माण होतो. त्यामुळे व्यक्तीला पुन्हा पुन्हा फिट्स येण्याचा, म्हणजेच ‘एपिलेप्सी’ हा आजार उदभवतो .  त्यात झटके येतात किंवा ती
व्यक्ती विशिष्ट तऱ्हेने वागते . एपिलेप्सी मधे हे झटके वारंवार येतात. जेव्हा झटके नसतात तेव्हा ती व्यक्ती इतर सामान्य माणसांसारखीच  असते. भारतात याचे प्रमाण १% आहे. म्हणजे१०० मध्ये एका व्यक्तीला एपिलेप्सी असते.    

 एपिलेप्सीचे काही प्रमुखप्रकार

जनरलाइज्ड एपिलेप्सी

सामान्यतः आढळणारा हा प्रकारआहे. जनरलाइज्ड एपिलेप्सीला मेजर एपिलेप्सी असेदेखील म्हंटले जायचे . यामधे  मेंदूच्या सर्व भागात एकदमच रोगाची सुरुवात होते. अटॅक सुरुझाल्याबरोबर रुग्ण किंचाळून खालीपडतो आणि बेशुद्ध होतो. रुग्णाची दातखीळ बसते, हात पाय ताठ होतात, डोळे फिरले जातात. काही क्षणानंतर शरीराला दोन्ही कडे झटके येतात, तोंडाला फेस येतो, जीभ चावली जाते, तसेच केव्हा कपड्यात मुलमुत्र विसर्जन होते. काही वेळानी हे झटके आपोआप कमी होतात. स्नायू शिथिल होतात, रुग्ण शांत होतो आणि काही वेळ गुंगीत राहून मग शुद्धीवर येतो. नंतर थोडा वेळ रुग्णाचे डोके दुखत राहते. हे अटॅक गाढ झोपेत पण येऊ शकतात.

 पार्शल किंवा फोकल एपिलेप्सी

यात मेंदूच्या एका विशिष्ट भागात विद्युत प्रवाहाची सुरुवात होते. आणि कधीकधी ती दुसरीकडे सुद्धा पसरते. यात पुष्कळदा रुग्णाला एका हाता पासून किंवा पायापासून किंवा चेहऱ्यावर झटके सुरु होतात आणि हळूहळू दुसऱ्या भागात पसरतात. या प्रकारात त्या व्यक्तीची शुद्ध शाबूत राहू शकते किंवा कमी होऊ शकते .

मयक्लोनिक  एपिलेप्सी

या प्रकारात एकदम दचकल्यासारखे झटके येतात. हातातली वस्तू खाली पडते किंवा ती व्यक्ती खाली पडते. आणि लगेच उठून उभी राहते. या अटॅकमधे रुग्ण बेशुद्ध होत नाही. हे अटॅक्स  सकाळी जास्त येतात.

कॅटॅमेनिअल एपिलेप्सी

 काही मुलींना अथवा स्त्रियांना पाळी येण्या अगोदर किंवा कधी पाळी संपल्यावर अटॅकस येतात. याचं कारण, काही मुली किंवा स्त्रीयांमध्ये असलेले हॉर्मोनल सेन्सिटिव्हिटी हे आहे.

एपिलेप्सीच्या सर्व प्रकारांवर औषधोपचार करण्यात येतात. नियमित औषधोपचार घेतले तर अटॅक्स नियंत्रणात येतात.  डॉक्टरांचा सल्ला तंतोतंत पाळला गेला तर  फिट्स-मुक्त  जीवन आनंदाने जगता  येते.  औषधांचा कालावधी ३ वर्षते पाच वर्ष असा असतो. 

सर्वसामान्यपणे ८०% एपिलेप्सी पीडित व्यक्ती एक सामान्य, नॉर्मल आयुष्य जगू शकतात. जर नियमित औषधे घेऊन व जीवन शैली व्यवस्थित ठेवून ३-५ एकही फिट आली नाही, तर अर्ध्या लोकांची औषधे बंद ही होऊ शकतात (डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार).